येड्यांच्या बाजारात पेडयांचा पाऊस.....

Name:
Location: Solapur, Maharashtra, India

Friday, May 19, 2006

पुन्हा येड्यांच्या बाजारात.....

बातम्यांसारखीच कथा इतरांची.....
१९८८ सालची गोष्ट.... रविवारचा दिवस होता. तसं आमचा रविवार म्हणजे पूर्णपणे क्रिकेटच्या चरणी वाहिलेला असायचा, पण हा रविवार काहीसा वेगळा होता. त्या दिवशी आमच्या घरी स्वतःचा टीव्ही येणार होता (स्वतःचा मुद्दाम म्हटलं..... कारण त्या काळापर्यंत टीव्ही म्हणजे शेजारच्या शेठजींच्या घरातला किमती ऐवज होता). सकाळी दुकानात गेलेले वडील दुपारी दोनच्या आसपास टीव्ही घेउन आले. त्यांच्या सोबत आलेल्या टेक्निशियननं आधी ऍन्टेनाच्या काड्या पट्टीवर स्क्रूने आवळून लोखंडाच्या दांडीवर बसवल्या आणि ऍन्टेना गच्चीवर घेऊन गेला. खाली त्याने आम्हाला ऍन्टेनाची तार टीव्हीला लावून दिली होती आणि म्हणाला, "मी वर जाऊन ऍडजस्ट करतो, काही दिसलं तर मला ओरडून सांगा". मग तो ऍन्टेना इकडेतिकडे फिरवत दूरदर्शन केंद्राच्या टॉवरच्या दिशेला त्याने वळवला आणि..... होSSSS!!!..... टीव्हीवरचं मुंग्यांचं वारूळ शांत झालं. पहिलंवहिलं दृश्य आम्ही आमच्या टीव्हीवर पाहिलं......

"सात रंगांच्या उभ्या पट्ट्या" आणि त्यासोबत "कूंSSS" असा शिट्टीसदृश आवाज.

खालनं कुणीतरी आरोळी ठोकली.... " आलं रेSSSS आलं, दिसलं.... दिसलं!!!!" टेक्निशियन खाली आला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. तीन वाजले होते. कार्यक्रम चार वाजता चालू होतील एवढं सांगून तो निघून गेला. मग चार वाजेपर्यंत त्या व्हिडिओकॉनच्या कृष्णधवल पोर्टेबल टीव्हीला हळदकुंकू, हार, साखरेचा खडा आणि नारळ अर्पण झालं. कोणीतरी ओरडलं.... "बंद करा रे.... ऐकू येत नाही का? किती ' कूंSSS कूंSSS' करतंय. टीव्ही खराब होतो जास्त आवाज झाल्यामुळे".
शेवटी कानाखाली खाडकन वाजवून दिल्याप्रमाणे तो सप्तरंगी पडदा फट्कन बाजूला झाला आणि दूरदर्शनचा ग्रहगोल गिरक्या मारू लागला. शेवटी "सत्यम शिवम सुंदरम" असा संदेश देत कार्यक्रम चालू झाला. सर्वात पहिल्यांदा दूरदर्शनचे घडयाळ घटका मोजू लागले आणि घटका पूर्ण होतात न होतात तोच आणखीन एकदा कोणीतरी त्याच्या कानाखाली ठेवून दिली आणि समोर एक पाटी आली..... तिच्यावर लिहिलं होतं....

"रूकावट के लिये खेद है."

हा आमच्या घरातला टीव्हीवरचा पहिलावहिला कार्यक्रम.....!!!!!

त्यालासुद्धा कोणीतरी एक कारणमीमांसा सांगितली..... "ते दिल्लीच्या दूरदर्शन केंद्रातले लोक चहा प्यायला गेले असतील... चार वाजलेत ना दुपारचे!!!"

शेवटी जेव्हा कार्यक्रम पुन्हा चालू झाला तेव्हा एक मालिका चालू झाली होती..... भारती आचरेकर आणि अमोल पालेकरची "आ बैल मुझे मार". ती आम्ही पाहिलेली टीव्हीवरची सर्वात पहिली मालिका. नंतरच्या काळात बुनियाद, हमलोग, कहॉं गये वो लोग, मृगनयनी, रामायण, विक्रम वेताळ, अडोस पडोस, मिस्टर ऍन्ड मिसेस, वाह जनाब, हीरा पन्ना, एक कहानी, कथासागर, नुक्कड, ये जो है जिन्दगी, तलाश, एक दो तीन चार, फूल खिले गुलशन गुलशन, मुंगेरीलाल के हसीन सपने, मुल्ला नसीरूद्दीन अशा एक ना अनेक दर्जेदार मालिका टीव्हीवर आल्या.
काळ बदलू लागला. १९९०ला मी सातवीत असताना मागच्या बाकावर बसणारा 'भिड्या' म्हणाला, तुमच्याकडे झी टीव्ही दिसतो का रे?" उत्तर अर्थात नकारार्थीच होतं परंतु झी टीव्ही म्हणजे काय प्रकार आहे हे कुतुहूलही मनात जागं झालं. नंतर वाटलं हे कुठलंतरी विदेशी चॅनल असावं आणि त्यावर काहीतरी 'मसालेदार' दाखवत असणार. पण हळूहळू हा गैरसमज दूर झाला आणि.... ते म्हणतात ना.... "घरोघरी फॅशनेबल पोरी".... किंवा "घरोघरी मातीच्या चुली"... की काय ते, तसं काहीसं होत गेलं. मुंबईचं शांघाई होण्याच्या नुसत्या घोषणाच होत राहिल्या..... पण घराघराचं थिएटर केंव्हा होऊन गेलं कळालंसुद्धा नाही.
जसजशी ह्या थिएटर संस्कृतीची मुळं खोलवर रुजू लागली तसतसे त्यावरून प्रसारित होणा-या कार्यक्रमांतही बदल झाले. टीव्ही चोवीस तास चालू झाला. स्पर्धा वाढली. भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची वेळ आता आली आहे. दिवसभर ही कुत्री पिसाळल्यासारखी भुंकत असतात. त्यांना प्रतिसाद देणारे प्रेक्षकही काही कमी नाहीत. "एकता"ने चावल्यामुळे अनेकांना "सिरीयलोफिलीया ऑफ सासबहू"ची लागण झाल्याचे आपण घराघरातूंन पाहतो. आणि हे लोक बघतात तरी काय असे झपाटल्यासारखे, तर.... कुणाची भांडणे आणि कुणाची लफडी. बारा गावचे बत्तीस तमाशे ह्या ना त्या चॅनलवर अहोरात्र आपला फड उभारून असतात. आणि नवल म्हणजे वर्षानुवर्षे ह्यांचं तुणतुणं वाजतच असतं. मागे बुनियादमधले मास्टरजी (आलोक नाथ) आणि लाजोजी (अनिता कंवर) ,मालिका जरी लांबलचक असली तरी वर्षभराच्या अंतराने वयस्क होत गेलेले पाहिले होते. दोनएक वर्षांत त्यांना वृद्धावस्था आली होती. पण आता काय अवस्था झाली आहे..... आमच्या अंगणात लावलेल्या औदुंबराच्या रोपटयाचे झाड झाले आणि त्याला उंबर लागू लागले आहेत पण ही टीव्हीवरची "तुळशी" म्हातारी होण्याचे काही नाव नाही. कैलास पर्वतावरची पार्वतीदेवी शंकराजवळ हट्ट करत असेल..... मला त्या टीव्हीवरची "पार्वती" लावते तो शाम्पू आणून द्या म्हणून!!!!! ते बजाज आणि प्रेरणा बहुतेक मी म्हातारा होईपर्यंत भांडणार आहेत अशी मला शंका आहे. ती मंदिरा आणि पायल कारस्थानं करायचं काही सोडणार नाहीत..... माकडं म्हातारी झाली तरी कोलांट्या मारायचं जसं सोडत नाहीत त्यातलाच हा प्रकार. कहर म्हणजे फक्त हिंदी नाही, तर मराठी वाहिन्यांवरही ह्यांचा सुळसुळाट झाला आहे. गाजरगवताच्या बिया एकदा शेतात पडल्या की सगळीकडे हे तण पसरल्याशिवाय राहत नाही. मराठी वाहिनीवरच्या सासूचे चार दिवस आहेत असं मला मुळीच वाटत नाही. निदान चौदा वर्षेतरी हा सासुरवास आपल्याला भोगावा लागण्याची चिन्हे दिसताहेत. अहो तुम्ही उच्छाद मांडला नव्हता त्यामुळेच तर आमची घरं "गोजिरवाणी" होती..... आता तुम्ही आमच्या घरात "गोचिडावाणी" चिटकून बसला आहात. आता एक तर आमचं "भाग्य" नाहीतर आमचा "विधाता" ह्यांचाच काय तो आधार राहणार आहे. आम्ही उगाचच तुमच्या वरलिया रंगाला भुललो आणि "या... सुखांनो या" म्हणालो.... आणि तुम्ही आता ठाण मांडूनच बसलात ना आमच्या घरात.... दिवाळसणाला म्हणून येऊन, हलायचे नाव न घेणा-या जावयासारखे!!!

रोजरोजचे हे प्रकार पाहून, राहून राहून मला सारखी माझ्या मित्राची आठवण येते, जो मला कॉलेजला असताना ते ब्रम्हवचन सांगून गेला.....

"येड्यांच्या बाजारात पेड्यांचा पाऊस"....

दुसरं काय.....?

Thursday, May 18, 2006

मी एम.एस्सी.ला असताना एका वर्गमित्राकडून ही म्हण मी ऐकली होती. आजकाल असं वाटतंय की जिकडं बघावं तिकडं हीच परिस्थिती आहे. जिकडेतिकडे वेडे ठासून भरले आहेत आणि आभाळातून मुसळधार पेढे पडताहेत.
हा विचार मनात येण्याचं प्रासंगिक कारण म्हणजे टी.व्ही. वरच्या बातम्या. एक नाही, दोन नाही..... जवळजवळ वीस-पंचवीस वाहिन्यांवरून सतत बातम्या गिरणीतून पडणा-या पिठासारख्या सांडत असतात. एखादी घटना घडली रे घडली की तिची बातमी होते. शेजारच्या काकूंना नातू झाल्याचंही आधी टीव्हीवर कळतं. पलीकडच्या गल्लीतली गटार फुटली रे फुटली की तिथं एक बातमीदार हजर. डोकं भंडावून जातं. कळत नाही की ह्या प्रसार माध्यमांना इतके वार्ताहर मिळतात कुठून? आणि आजकाल त्यात "स्टिंग ऑपरेशन"ची भर पडलेली आहे. तळमजल्यावरच्या प्रशांतला त्याच्या आईवडिलांनी काल चक्क टीव्हीवर पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. कॉलेजच्या मुलांना सिगारेटच्या व्यसनानं कसं वेड लावलं आहे ते एका चॅनलवर दाखवलं जात होतं. प्रशांतच्या कॉलेजजवळच्या पानपट्टीचं चित्रीकरण एका मारुती कारमध्ये लपून घेण्यात आलं होतं. ही घडली घटना आणि ही घ्या बातमी असं काहीसं होऊन बसलंय. बरं नुसतं बातमी द्यायचं राहूद्या बाजूला, बातमी चटपटीत कशी होईल आणि प्रेक्षकांच कुतुहूल कसं वाढेल ह्याकडे हे बातम्यांचे चॅनल्स खास लक्ष देतात. प्रत्येकाला एकच सांगायचं असतं.... "आम्हीच ही बातमी सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोचवली". अरे काय मग.... थोडा उशीर झाला असता तर काय तुला जाब विचारायला येणार होतो की काय आम्ही? आणि झालाच असता जरासा उशीर तर निदान व्यवस्थित बातमी तरी आणली असतीस की! उदाहरणार्थ आपले अर्थमंत्री समजा म्हणाले की विकासाचा दर ८ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे की लागले हे आपली खिचडी शिजवायला..... ते असं का बोलले? असं कसं बोलले? कधी बोलले? कोण कोण होतं त्यांच्या सोबत? विकासाचा दर ह्याचा अर्थ काय असतो? त्याची उत्पत्ती कशी झाली? औरंगजेबाच्या काळात विकासाचा दर किती होता? आता ह्याचे परिणाम काय होणार? सामान्य माणसाची काय अवस्था होणार?...... अरे आवरा जरा. जणू काही आज एक आंदोलनच उभं करताय. पण उद्या आणखी कोणीतरी काही बोललं की आज जे काही सांगत आहात ते हवेत विरून जातं आणि पुन्हा तुमचं "नवा गडी नवा डाव" सुरू होतं. पत्त्यांचे बंगले बनवणं हा ह्यांचा रोजचाच धंदा आहे.
काही दिवसांपूर्वी एक घटना घडली.... दाऊद इब्राहीमच्या मुलीचं लग्न जावेद मियॉंदादच्या मुलासोबत दुबईतल्या एका हॉटेलात झालं...... झालं म्हणजे.... झालं!!... एक गुळाचा खडा दुबईत सापडला, आणि लागलीच गर्दी झाली मुंगळ्यांची. एका चॅनलवरती मी पाहिलं... म्हणत होते.... जगभरातली प्रसार माध्यमं इथं गोळा झाली आहेत, पण फक्त आमच्याच चॅनलला आत जाण्याची परवानगी मिळाली.... (खास डॉनकडून!!!!) मी चॅनल बदललं.... आणि चक्क ह्या चॅनलवरही हे तेच सांगितलं जात होतं. पुन्हा पुढच्या चॅनलवर गेलो.... हे महाराज तर म्हणत होते...."आत्ता आतूनच येतोय (रसमलाई एकदम छान झाली आहे... वा).... मला एकट्यालाच बोलावलं होतं.... (मागे डॉनबद्दल एक विशेष कार्यक्रम दाखवला होता ना.... त्याची आठवण करून देत होते)!!" अरे काय ताळतंत्र आहे की नाही? कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.
प्रमोद महाजन हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा मात्र कहर केला ह्या लोकांनी. प्रवीण महाजन त्यांच्या घरात कसा शिरला त्यापासून ते प्रमोद कसे कोसळले इथपर्यंत सर्व गोष्टींचे ऍनिमेशन करून दाखवले जात होते. जणू काही प्रवीण ह्यांच्याकडे आधी आला होता आणि म्हणाला होता...." चला माझ्याला भावाला गोळ्या घालू". रोज महाजनांच्या शरीराचा आडवा छेद (Tranverse Section) दाखवून यकृत, स्वादुपिंड आणि आतडी कुठे असतात ह्याचा क्लास घेतला जात होता. एक वार्ताहर कॉन्फरन्स कॉलवरून एका डॉक्टरसोबत निवेदिकेबरोबर चर्चा करत होता आणि डॉक्टरसाहेबांना विनंती करत होता की... "साहेब... तुम्ही तुमच्या पोटावरून हात फिरवून सांगा की पॅन्क्रियाज (Pancreas = स्वादुपिंड) कुठे असतं आणि महाजनांना कुठेकुठे गोळ्या लागल्या आहेत?" आणि ते डॉक्टरही लगेच आपल्या पोटावर हात फिरवू लागले आणि कॅमेराही त्यांच्या पोटावरून फिरू लागला. हे सगळं पाहून हसावं की रडावं तेच कळेना. तीच कथा सचिन तेंडुलकरच्या दुखापतीची आणि अमिताभ बच्चनच्या आतड्यांची. सरसकट सगळ्या वाहिन्यांवर त्यांची ऑपरेशन्स केली गेली.
मी दहावी आणि बारावीला असतानाचं आठवतं, टीव्ही पाहण्यावर घरात बंदी होती. टीव्ही फक्त रात्री साडेआठ वाजता लागायचा..... राष्ट्रीय समाचार पाहण्यासाठी. वर्षानुवर्षे जे.व्ही.रमण, मंजिरी जोशी, सलमा सुल्तान, किंवा वेदप्रकाश हेच बातम्या सांगायचे. एक तासभर बातम्या प्रसारित होत असत..... अर्धा तास हिंदीतून आणि अर्धा तास इंग्रजीतून. "खबरें अभी और भी हैं..... देखते रहिये".... असला प्रकार तेव्हा नव्हता. ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखी सारखी टीव्हीची काच फोडली जात नव्हती. हातातली कागदपत्रे वाचून तो निवेदक मोकळा होत असे. आयुष्यभरात एक अर्धशतकही न ठोकू शकलेले क्रिकेटपटू हातात बॅट धरून काल्पनिक (virtual) खेळपट्टीवर विक्रमी खेळखंडोबा करत नव्हते. आठवडाभर अंघोळ न केलेला "झिप-या समंध" रात्री अकरा वाजता "सनसनी" (सन ऑफ शनी) नावाचा गोंधळ घालत नव्हता. बंगाली बाबांच्या आणि भुरट्या चोरांच्या मागे धावणारा "क्राईम रिपोर्टर" तेव्हा नसायचा.
शेवटी कालाय तस्मै नमः
कालानुपरत्वे वाढत जाणारी स्पर्धा आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केला जाणारा केविलवाणा आटापिटा ह्यातून उगवलेले तण म्हणजे असले एकाहून एक मूर्खशिरोमणी. मिर्जा गालिब जसे म्हणतो....
"बेवकूफोंकी कमी नही है गालिब,
एक ढूंढो, हजार मिल जायेंगे".

त्यालाच आपण आपल्या ग्रामीण 'श्टाईलीत' म्हणतो.....

"येड्यांच्या बाजारात पेड्यांचा पाऊस".